Pune Breaking l बसस्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात थेट टेम्पो घुसला ! तिघांचा जागीच मृत्यू; बोपदेव घाटातील घटना


सोमेश्वर रिपोटर टीम——

पुणे : प्रतिनिधी 

पुणे शहरातील बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटून बसस्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, पाच ते सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोपदेव घाटात आज हा अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट बसस्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत घुसला. टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की, काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी विद्यार्थ्यांचे दप्तर आणि शैक्षणिक साहित्य विखुरलेले दिसून आले.

अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, हा अपघात टेम्पोच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने झाला की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला, याचा तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेतील मृत आणि जखमी विद्यार्थ्यांची अधिकृत माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

To Top