सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
साहित्यिकाच्या अंगी नम्रता आणि आत्मीयता असणे आवश्यक आहे. आपल्या लेखणीतून विविध संदर्भांचा आधार घेत साहित्यिक समाजाला जागृत करण्याबरोबरच माणसांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करू शकतो. त्यामुळे साहित्यिकांनी स्वतः बोलण्यापेक्षा त्यांच्या साहित्याने अधिक बोलले पाहिजे, असे प्रतिपादन युवा आयकॉन विवेकानंद पाटील यांनी केले.
नारोळी (ता. बारामती) येथील तुकाईदेवी मंदिरात पायल ढमे यांच्या ‘ थांबू नको... तुझा प्रवास इतिहास बदलू शकतो ’.... या तिसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन युवा आयकॉन विवेकानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी खेत्रे होत्या.
यावेळी विवेकानंद पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी तसेच विविध साहित्यकृतींमधील संदर्भ देत साहित्याचे महत्त्व विशद केले. साहित्यिकाचा भाव निर्मळ असेल, तर देवही त्याला भेटायला येतो, असे सांगत त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून समाजाला दिशा देणारे आणि माणसांमध्ये आत्मीयता निर्माण करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी येथील सरपंच बाळासाहेब गोसावी, प्रमोद खेत्रे, शेखर फराटे, विकास निर्मळ, संतोष काटे, अनिता धापटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी हनुमंत चांदगुडे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी प्रकाश लोणकर यांनी केले. शिवाजी ढमे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दीपक पडकर यांनी आभार मानले.



