सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती l प्रतिनिधी
ईगल फाउंडेशन,सांगली वतीने समाजातील शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, शेती वैद्यकीय आणि वैचारिक क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रविवार,१ नोव्हेंबर रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट,कोर्टी-पंढरपूर येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
शारदा अकॅडमी सोमेश्वरनगर ता. बारामती येथे कार्यरत प्रा.अमीर मुमताज सलीम इनामदार यांना राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह,मानपत्र व मानाचा फेटा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर,दै.आधुनिक केसरी चे संपादक डॉ. प्रभू गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ईगल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर म्हणाले- "प्रा.इनामदार यांचे व्यक्तिमत्व ज्ञानदानसोबत विद्यार्थी जडणघडणीतून अधिक "अमीर" व्हावा असे असून शैक्षणिक, सामाजिक व कौशल्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम कार्याची विशेष दखल घेत त्यांच्या गुणवत्ता व योगदानाची पुरस्कार रूपाने दखल घेण्यात आली आहे, विचारी तरुणाई आणि निरपेक्ष भावनेने माणूस म्हणून सदाचारी माणूस निर्माण करण्यासाठी अमीर इनामदार यांची सातत्यपूर्ण धडपड वाखनण्याजोगी आहे"असे गौरवोद्गार कोळेकर यांनी काढले.ईगल फाउंडेशन भविष्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असून या विधायक वाटचालीत प्रा. इनामदार यांचे प्रेम, मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल,असा विश्वास विलासराव कोळेकर यांनी व्यक्त केला.यावेळी संवाद साधताना जानकर म्हणाले- "विवेकवादी चळवळीत विद्यार्थी दशेपासून काम करणारे अमीर इनामदार यांच्याशी माझा अल्प परिचय होताच अमीर यांचे आजोळ माण तालुक्यातील म्हसवड असून मीही माण तालुक्याचा आहे,
माझ्या मातीतल्या माणसाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मला विशेष अभिमान वाटत आहे" गरुडझेप पुरस्काररुपाने प्रा.अमीर इनामदार यांच्या गत पंधरा वर्षांतील कार्य-उपक्रमाची ईगल फौंडेशनद्वारे राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



