सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वडगाव निंबाळकर; प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यातील तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले.
अमर सोमनाथ चव्हाण वय २६ रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती असे आरोपीचे नाव असून, त्याच्या चौकशीत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी अमर चव्हाण हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी गावात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला शिताफीने पकडले. चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या चोरीच्या गुन्ह्यातील टीव्हीएस कंपनीची 'टीव्हीएस स्पोर्ट' मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
ही कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस शिपाई विकास येटाळे, भानुदास सरक, चालक हवालदार शेंडकर आणि चालक होमगार्ड संदीप कसबे यांनी केली.





