Jawali News l मेढा स्मशानभूमीच्या विकासासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर; शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश!


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

मेढा : सोमनाथ साखरे 

जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने तब्बल २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले आहे. आधी स्मशानभूमीच्या जागेचा तिढा सोडवून आता विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाल्याने मेढावासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मेढा नगरपंचायत हद्दीतील हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्काराच्या मूलभूत सुविधांशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष लक्ष दिले. सर्वप्रथम स्मशानभूमीच्या जागेसंदर्भातील कायदेशीर व तांत्रिक अडचणी दूर करून जागेचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रयत्नांना यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा १०० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून मेढा नगरपंचायतीची नियुक्ती करण्यात आली आहे. विकासकामांना जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक असून, ई-निविदा प्रक्रियेद्वारे कामे पूर्ण केली जाणार आहेत. प्रत्येक काम किमान दहा लाख रुपयांचे असावे, कामांचे कृत्रिम विभाजन करू नये आणि मंजूर निधीचा पारदर्शकपणे विनियोग करावा, अशा स्पष्ट अटी शासनाने घातल्या आहेत.

मेढा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावून स्मशानभूमीच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नगरपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी आभार मानले आहेत. नगराध्यक्षा रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, बांधकाम सभापती शिवाजी देशमुख, आरोग्य सभापती नितीन मगरे, महिला व बालकल्याण सभापती आनंदीताई करंजेकर यांच्यासह नगरसेवक शिवाजी गोरे, रिकी तिवाटणे, सुशांत कांबळे, धनंजय पवार, नगरसेविका सुनीता तांबे, तेजस्वी इगावे, अनघा करंजेकर, पुष्पा मुकणे व सर्व नगरसेवकांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नाला आता आर्थिक बळ मिळाल्याने मेढा शहरात लवकरच सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

To Top