बारामती l पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची तयारी; कुस्तीच्या तालमीत शस्त्रे लपवली! चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती : प्रतिनिधी

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली लपवून ठेवलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. शिवाजीनगर, कसबा परिसरातील शिवाजीनगर गणेश मंदिराशेजारी असलेल्या कुस्तीच्या तालमीतून चार धारदार लोखंडी कोयते आणि एक तलवार अशी एकूण पाच घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पूर्ववैमनस्यातून एखाद्यावर गंभीर हल्ला करण्याच्या तयारीने ही शस्त्रे लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बारामती शहरातील खंडोबानगर, शिवाजीनगर, कसबा आणि परिसरात मारामारी, धमकावणे, दहशत निर्माण करणे तसेच बेकायदेशीर शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याचदरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांना विश्वासू बातमीदारामार्फत काही इसमांनी पूर्वीच्या वादातून हल्ला करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे गोळा करून ती कुस्तीच्या तालमीत लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.

या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी संबंधित तालमीत शोधमोहीम राबविली असता लाल मातीखाली लपवून ठेवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार आढळून आली. पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर पंचनामा करून ही शस्त्रे जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई गिरीश नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९८/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ सह २५(१-ब)(ब) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात योगेश उर्फ धन्या गोकुळ कांबळे (रा. जामदार रोड, कसबा), आदेश संजय कुचेकर (रा. साठेनगर, कसबा), ऋषिकेश उर्फ पप्पू अनिल चंदनशिवे (रा. साठेनगर, कसबा) आणि अभिजीत प्रदीप शिंदे (रा. मळद, ता. बारामती) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अटक केलेल्या चारही आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदी तपासल्या असता त्यांच्याविरुद्ध एकूण ११ पूर्व गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारहाण, धमकी तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

आरोपींनी ही शस्त्रे नेमकी कोठून आणली, ती कोणी पुरवली, तालमीतील लाल मातीखाली कोणी लपवली, तसेच पूर्ववैमनस्यातून कोणावर हल्ला करण्याचे नियोजन होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. या सर्व बाबी अद्याप तपासाधीन आहेत.

चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत एकशिंगे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, सादिक काझी आणि अक्षय सिताफ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.

दरम्यान, परिसरात कोणी बेकायदेशीर शस्त्रे बाळगत असल्याची किंवा शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

To Top