सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जपरतफेडीसाठी विशेष सवलती देण्यात याव्यात, तसेच कर्जाच्या व्याजामध्ये सूट देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रेवणनाथ अण्णा दारवटकर यांनी केली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजगड तालुक्यातील आंबवणे शाखेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान आणि शेतकरी मेळावा शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर २०२६) करंजावणे येथील पार्वती मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा व सहकारी संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे,ज्येष्ठ संचालक रेवणनाथ अण्णा दारवटकर, ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.तान्हाजी बाप्पु मांगडे संचालिका निर्मलाताई जागडे यांच्यासह बॅंकेचे अधिकारी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी रेवणनाथ अण्णा दारवटकर यांनी राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीकडे बँक प्रशासनाचे लक्ष वेधले. तालुक्यातील शेतकरी नियमित कर्जपरतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, शेतीसमोरील वाढती आव्हाने आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजात सवलत देण्याबाबत बँकेने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.
बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियमित व काटेकोर कर्जपरतफेडीचे विशेष कौतुक केले. राजगड तालुक्यातील शेतकरी कर्जफेडीच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार्य यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी भोर, राजगड व मुळशी तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते व दळणवळण सुविधांच्या विकासामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ होणार असून, त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
बँकेच्या संचालिका निर्मलाताई जागडे यांनी राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जफेडीतील तत्परतेचे आणि आर्थिक शिस्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उल्हास दारवटकर यांनी उपस्थित मान्यवर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि शेतकरी बांधवांचे स्वागत केले.
या मेळाव्यात राजगड तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सहकार चळवळीला अधिक बळकटी देणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.



