सांगली l मराठी अर्थशास्त्र परिषद अधिवेशनाच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल म्होपरे तर कार्यवाहक व खजिनदारपदी डॉ. दरेकर यांची बिनविरोध निवड


सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 

विटा : प्रतिनिधी 

मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अर्थात पन्नासाव्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूर येथील डॉ. राहुल म्होपरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, पुढील तीन वर्षांसाठी परिषदेच्या कार्यवाह-खजिनदारपदी डॉ. अजय दरेकर, तर परिषदेच्या त्रैमासिक संशोधन पत्रिका ‘अर्थसंवाद’च्या मुख्य संपादकपदी डॉ. मारोती तेगमपुरे यांची अविरोध निवड झाली.


रयत शिक्षण संस्थेच्या विटा (ता. खानापूर, जि. सांगली) येथील बळवंत महाविद्यालयात आयोजित मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४९ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात झालेल्या सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या.


मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सुवर्ण महोत्सवी पन्नासावे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात आयोजित करण्यात येणार आहे. सन २०२७-२८ मध्ये होणाऱ्या या अधिवेशनाच्या ठिकाणासह राष्ट्रीय परिषदेच्या विषयांनाही सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.


परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीत महाराष्ट्रातील दहा सार्वजनिक विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण ५० व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. व्याख्याने आयोजित करण्यास इच्छुक महाविद्यालयांनी आपले प्रस्ताव परिषदेच्या कार्यवाह-खजिनदारांकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.



सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय अधिवेशनांतर्गत आयोजित राष्ट्रीय परिषदेसाठी तीन महत्त्वपूर्ण संशोधन विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये बदलत्या भू-आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतांची चिकित्सा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय अर्थव्यवस्था तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांचे आर्थिक विचार या विषयांचा समावेश आहे. या विषयांवर महाराष्ट्रासह देशभरातील संशोधकांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.



परिषदेच्या ४९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात विविध पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. राहुल म्होपरे (२०२७-२८), कार्यवाह-खजिनदारपदी डॉ. अजय दरेकर आणि ‘अर्थसंवाद’च्या मुख्य संपादकपदी डॉ. मारोती तेगमपुरे (२०२७-२८ ते २०२९-३०) यांची निवड झाली.


तसेच विश्वस्तपदी वसंत दगडू पाटील, तर कार्यकारिणी सदस्यपदी सुभाष भालेराव, डॉ. सुभाष पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. गजानन बनचरे आणि डॉ. चंद्रकांत जाधव यांची निवड करण्यात आली.


मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक आणि प्राध्यापकांना संशोधन व विचारांच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

To Top