बारामती l विशेष कार्यकारी अधिकारीपदी युवराज खोमणे व अॅड. नवनाथ भोसले यांची नियुक्ती सामाजिक कार्याची दखल


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने ४१ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरूम (ता. बारामती) येथील रहिवासी, सोमेश्वरनगर येथील दैनिक पुढारीचे पत्रकार तथा बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे आणि वाणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नवनाथ भोसले यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सोमेश्वर पंचक्रोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

युवराज खोमणे आणि अॅड. नवनाथ भोसले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दोघेही सातत्याने प्रयत्नशील असतात. रक्तदान शिबिरे, आरोग्य सेवा, साद संवाद स्वच्छता प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम, गरजू नागरिकांना मदत, शैक्षणिक उपक्रम तसेच विविध सामाजिक कार्यांतून त्यांनी पंचक्रोशीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याची आणि जनसेवेतील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव असून, संपूर्ण सोमेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या नियुक्तीबद्दल सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दोघांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, शासनाच्या विविध योजना आणि सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही युवराज खोमणे आणि अॅड. नवनाथ भोसले यांनी दिली.त्यांच्या या निवडीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

To Top