सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळावर मंगळवार, दि. १० रोजी पाडवा सणानिमित्त कृतज्ञतेचे दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कृतज्ञता-अभिवादन कार्यक्रमासाठी राज्यात व देशात शासकीय सेवेत कार्यरत असलेले बारामतीकर अधिकारी आणि परिसरातील अधिकारी मंडळी तसेच अनेक कर्मचारी एकत्र येत आहेत. बारामती येथे बारामती प्रतिष्ठान यांनी आज आयोजित 'आपली बारामती आपली माणसं' या अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात हा संकल्प सोडण्यात आला.
बारामतीसारख्या ग्रामीण भागातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बारामतीमध्ये स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम अजितदादांनी नेहमीच केले. स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करताना, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अजितदादा नेहमीच तत्पर राहिले. त्यातून बारामतीचे युवक-युवती मोठ्या संख्येने वर्ग १ व वर्ग २ च्या पदांवर शासकीय सेवेत दाखल झाले. तसेच तीन व चार श्रेणी कर्मचारीसुद्धा आहेत. बारामतीच्या या अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवेत काही अडचण आली किंवा त्रास झाला, तरी अजितदादा त्यांच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभे राहिले होते.
अजितदादांच्या जाण्याने फार मोठा आधार आणि पाठीराखा हरपल्याची या सर्व अधिकारी मंडळींची भावना आहे. तेच प्रतिबिंब आज उमटले. त्या भावनेतूनच पाडव्यानिमित्त अजितदादांच्या स्मृतिस्थळी 'एक दीप कृतज्ञतेचा' हा उपक्रम राबवण्याचे या अधिकाऱ्यांनी ठरवले आहे.
दिवाळीत प्रत्येक पाडव्याला हे सर्वजण अजितदादांची भेट आवर्जून घ्यायचे. आता दादा नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी सुट्टीवर आलेल्या बारामती व परिसरातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन 'आपली बारामती, आपली माणसं' या बारामतीच्या अधिकाऱ्यांच्या समूहाने केले आहे.


