पुरंदर l पाडव्याला नवीन बुलेट घरी आणण्याचे स्वप्न अधुरेच! दिवेघाटात ॲम्बुलन्सची धडक; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

नीरा; प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील ३० वर्षीय करण धनाजी गायकवाड या तरुणाचा दिवेघाटात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यातून नवीन बुलेट खरेदी करून घरी परतत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने करण हा आपल्या मित्रांसोबत पुण्यात नवीन बुलेट खरेदी करण्यासाठी गेला होता. नवीन बुलेट घेऊन मित्रांसह घरी परतत असताना दिवेघाटात बुलेटला  ॲम्बुलन्सने जोरदार धडक बसली. या अपघातात करण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

करण आणि त्याची पत्नी दोघेही आयटी कंपनीत नोकरीस होते. नव्या बुलेटवरून घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या करणचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पिंपरे खुर्दसह परिसरात शोककळा पसरली आहे.

करण याच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Tags
To Top