सोमेश्वार रिपोटर टीम——
कोळवण : प्रतिनिधी
(पुणे) : मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मिल्कीबार वॉटरफॉल पाहून परतत असताना शॉर्टकटचा मार्ग निवडणे तरुणाच्या जीवावर बेतले. सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पर्यटनप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत असून, डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटन करताना सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत तरुणाचे नाव साहीद अंसारी (वय २०) असे आहे. तो सध्या ताथवडे येथे राहत होता. मूळचा बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बैकटपूर येथील रहिवासी असलेला साहीद चार मित्रांसह प्लस व्हॅली येथे पर्यटनासाठी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मिल्कीबार वॉटरफॉल पाहिल्यानंतर साहीद आणि त्याचे मित्र परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, नियमित पायवाटेने परतण्याऐवजी त्यांनी शॉर्टकटचा मार्ग निवडला. यावेळी सुमारे ४५ अंश उतार असलेल्या डोंगराळ भागातून जात असताना साहीदचा पाय घसरला आणि तो थेट अंदाजे २०० मीटर खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रोहा रेस्क्यू टीम, एस.व्ही.आर.एस.एस. आणि पौड पोलीस ठाण्याच्या पथकाने समन्वय साधत बचावकार्य सुरू केले. घटनास्थळाची भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण आणि धोकादायक असल्याने बचाव पथकासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेर तांत्रिक पद्धतीने रोप रेस्क्यू ऑपरेशन राबवून दरीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.





