सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती l प्रतिनिधी
शहरातील जामदार रोड परिसरात एका तरुणाला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून त्याला रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जयेश बाळासाहेब माने याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याच्यावर खुनाचा गुन्हा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने आरोपीला ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बारामती शहरातील जामदार रोड, ग्रीन सिटी परिसरातील अक्षदा गार्डनजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी सुमित संतोष सोनवणे (वय २१, रा. बारामती) याला जयेश माने, सोमा यादव आणि प्रतीक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी अडवून त्याच्या इच्छेविरुद्ध पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून ग्रीन सिटी मैदान परिसरात नेले.
आदेश कुचेकर आणि धना कांबळे यांच्यासोबत फिरत असल्याच्या कारणावरून आरोपींनी सुमित याच्याशी वाद घातला. यावेळी जयेश माने याने त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हरसारखे दिसणारे काळ्या रंगाचे शस्त्र लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जयेश माने आणि सोमा यादव यांनी हातातील लाकडी मूठ असलेले धारदार कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. तिन्ही आरोपींनी सुमित याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जयेश माने याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मान व छातीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमितने बचावासाठी पाय वर केल्याने कोयत्याचा वार उजव्या पायाच्या गुडघ्यावर आणि गुडघ्याखाली लागला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याच्या पायाला सात टाके घालण्यात आले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू असताना ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना गोपनीय बातमीदारामार्फत जयेश माने हा खंडोबानगर परिसरातील काठियावाडी चहाच्या दुकानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई सागर जामदार आणि अक्षय सिताफ यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.
पोलिसांना पाहताच संशयित आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपाई सागर जामदार यांनी तत्परतेने त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर जयेश बाळासाहेब माने याला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली.
यापूर्वीही खुनाच्या गुन्ह्यात नाव
पोलिसांनी आरोपीचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता, बारामती शहर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४६/२०२४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. २१ ऑगस्ट २०२४ रोजी जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ गणेश धुळाबापू वाघमोडे (वय १७, रा. जळोची) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा आरोप जयेश मानेसह अन्य आरोपींवर आहे.
तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४११/२०२५ अन्वये शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे. त्यामुळे २०२४ मधील खुनाचा गुन्हा, २०२५ मधील शस्त्र अधिनियमाचा गुन्हा आणि आता २०२६ मधील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात त्याचे नाव समोर आले आहे.
अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या कालावधीत गुन्ह्यात वापरलेले कोयते, रिव्हॉल्व्हरसारखे शस्त्र आणि स्विफ्ट कार हस्तगत करणे, तसेच फरार आरोपी सोमा यादव व प्रतीक यांचा शोध घेणे, या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजय हरी टेळकीकर, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई सागर जामदार आणि अक्षय सिताफ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर करीत आहेत.



