Baramati News l वाघळवाडीच्या श्रावणी शिंदेची दिल्लीच्या आखाड्यात सुवर्णभरारी! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग पाच विजयांसह महाराष्ट्राला सुवर्णपदक


सोमेश्वर रिपोर्टर टीम——

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

दिल्ली येथे सुरू असलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत बारामती तालुक्यातील वाघळवाडीच्या श्रावणी संजय शिंदे हिने सुवर्ण कामगिरी करत महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे. १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात श्रावणीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला असून, तिच्या या यशामुळे वाघळवाडीसह संपूर्ण बारामती तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीतील त्यागराज स्टेडियम येथे दिल्ली सरकारच्या शिक्षण व क्रीडा संचालनालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कर्ष आश्रमशाळा, वाघळवाडी (सोमेश्वरनगर) येथे शिक्षण घेणाऱ्या श्रावणीने स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आपल्या कुस्ती कौशल्याची चुणूक दाखवत सलग पाच सामने जिंकले.

श्रावणीच्या विजयाची मालिका विशेष लक्षवेधी ठरली. तिने महाराष्ट्र विरुद्ध चंदीगड सामन्यात १०-०, केरळविरुद्ध १०-०, हरियाणाविरुद्ध ८-२, कर्नाटकविरुद्ध १०-०, तर दिल्लीविरुद्ध ४-० अशा गुणफरकाने विजय मिळवला. सलग पाच विजयांची नोंद करत तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले सोने!

श्रावणीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचा संघर्षही तितकाच प्रेरणादायी आहे. आजही तिचे आई-वडील पाईपलाईन चारी खोदण्याचे कष्टाचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लेकीने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविल्याने तिच्या कुटुंबाच्या कष्टाचे चीज झाले आहे. एका आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

श्रावणीला मार्गदर्शक मल्हारी भडलकर, चुलते भगवान शिंदे, सौरभ जाधव, प्रवीण सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सामान्य कुटुंबातील श्रावणीने राष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात मिळवलेले हे सुवर्णयश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर वाघळवाडी, सोमेश्वरनगर आणि संपूर्ण बारामती तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.

To Top