सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : हेमंत गडकरी
प्रस्थापित व्यवस्था, सामाजिक विषमता, शोषण आणि अन्यायावर आपल्या धारदार लेखणीतून प्रहार करणारे विद्रोही कवी मिर्झा ऊर्फ रोहित शिवाजीराव पेटारे यांचा ‘ग्रेव्हयार्ड : मुर्दाड समाजाच्या जिवंत कविता’ हा कवितासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. या कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्यानिमित्त दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार असून, दुसऱ्या सत्रात विद्रोही कवी संमेलन रंगणार आहे.
‘ग्रेव्हयार्ड’ हा कवितासंग्रह समाजातील मुर्दाड संवेदना, सामाजिक विषमता, शोषण आणि अन्यायाविरोधातील विद्रोही विचारांचा साहित्यिक दस्तऐवज ठरणार आहे. रोहित पेटारे यांच्या लेखणीतून व्यक्त होणारा सामाजिक आक्रोश आणि परिवर्तनाची आस या कवितासंग्रहातून वाचकांसमोर येणार आहे.
पहिल्या सत्रातील प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ प्रबुद्ध विद्रोही कवी पी. के. कवी बबनदादा सरवदे (मुंबई) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी विद्रोही कवी सागरदादा काकडे (सातारा) अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही कवी जितेंद्र सोनवणे (जित्या जाली) आणि प्रकाशक डॉ. पंकज चाळके (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रात विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध विद्रोही कवी आपल्या कवितांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, शोषित-वंचितांचे जगणे आणि परिवर्तनवादी विचार मांडणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पी. के. कवी बबनदादा सरवदे (कोल्हापूर) असणार आहेत. विद्रोही कवी जितेंद्र सोनवणे (पंढरपूर) आणि विक्रम कांबळे (राजन, सोलापूर) यांची उपस्थिती असणार असून, संमेलनाचे सूत्रसंचालन दादा बाचमारे करणार आहेत.
हा कार्यक्रम बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, पुणे रेल्वे स्टेशनजवळ, पुणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विद्रोही कवी मिर्झा ऊर्फ रोहित शिवाजीराव पेटारे आपल्या धारदार आणि बंडखोर लेखणीमुळे सोशल मीडियावर परिचित आहेत. त्यांच्या लिखाणातून ज्येष्ठ विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या लेखणीची झलक पाहायला मिळते. त्यामुळे ‘ग्रेव्हयार्ड’ हा आगामी कवितासंग्रह विद्रोही साहित्यविश्वात महत्त्वाचा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.





