सोमेश्वर रिपोर्टर टीम —–
पुणे : प्रतिनिधी
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका कार्यकर्त्याने लिहिलेले सविस्तर आणि भावनिक पत्र चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. या पत्रातून संबंधित कार्यकर्त्याने डिलिमिटेशन विधेयकाला ठाम विरोध करण्याची भूमिका मांडत सुप्रिया सुळे यांनी संसदेत या विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, अशी थेट मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील खासदार आणि आमदारांनीही कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संविधान आणि लोकशाहीच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे.
या पत्राच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पवार साहेब लवकरच पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात पक्षाच्या पातळीवर घेतल्या जाणाऱ्या धोरणात्मक निर्णयांबाबत कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता असल्याचे पत्रात नमूद केले आहे. विशेषतः डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे पुरोगामी विचारांच्या जनतेला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेच्या आधारे पुनर्रचनेला विरोध
डिलिमिटेशन विधेयकाच्या संभाव्य परिणामांवर प्रश्न उपस्थित करताना संबंधित कार्यकर्त्याने २०११ च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्यास विरोध दर्शविला आहे. नवीन जनगणनेनंतर उपलब्ध होणाऱ्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारेच मतदारसंघांची पुनर्रचना व्हावी, अशी भूमिका पत्रात मांडण्यात आली आहे. जुन्या आकडेवारीच्या आधारे पुनर्रचना केल्यास अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील अनेक वर्षांसाठी सामाजिक प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
नवीन जनगणनेच्या आधारे २०२७ मध्ये संविधानिक पद्धतीने मतदारसंघांची फेररचना होऊ शकते, तर सध्याच ही प्रक्रिया राबविण्याची घाई का केली जात आहे, असा सवालही पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. या घाईमागील राजकीय हेतू तपासण्याची गरज असल्याचे सांगत भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.
आसाममधील पुनर्रचनेचा संदर्भ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पारदर्शकपणे होईल, याबाबत पत्रलेखकाने शंका व्यक्त केली आहे. भाजपच्या राजकीय कार्यपद्धतीवर टीका करताना आसाममधील मतदारसंघ पुनर्रचनेचा संदर्भ देण्यात आला आहे. मतदारसंघांची आखणी करताना राजकीय सोय साधली जाण्याची शक्यता असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच डिलिमिटेशन कमिटीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्याची तयारी भाजप दाखवणार का, असा सवाल उपस्थित करून सत्ताधाऱ्यांच्या लोकशाही आणि संविधानाविषयीच्या भूमिकेची कसोटी यावर लागेल, असे मत व्यक्त केले आहे.
महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनची सांगड कशासाठी?
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही पत्रात स्वतंत्रपणे भूमिका मांडण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच संसदेत मंजूर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देण्यात आली आहे. महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या दोन वेगळ्या बाबी असून त्यांची सांगड घालण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिमिटेशनची अट पुढे करण्याऐवजी मंजूर विधेयकाची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन
पत्रातील सर्वाधिक भावनिक भाग शरद पवार यांच्या राजकीय आणि वैचारिक वारशाशी संबंधित आहे. पवार साहेबांनी गेली सहा दशके फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची कास धरली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समतावादी व लोकशाहीवादी विचारांचा वारसा जपला, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे केवळ राजकारण नसून त्यांच्या आयुष्यभराचे तप असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
आज साहेब आजारी असताना त्यांच्या मागे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयामुळे त्यांच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी पक्षातील प्रत्येक नेत्याची, पदाधिकाऱ्याची आणि कार्यकर्त्याची असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
सत्तेसाठी विचारांशी तडजोड नको; आमदार-खासदारांनाही सुनावले
पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याच्या चर्चांवरही पत्रलेखकाने नाराजी व्यक्त केली आहे. आर्थिक ताकद आणि सत्ता असल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत, हा युक्तिवाद करून वैचारिक भूमिका बाजूला ठेवणे योग्य नसल्याचे पत्रात म्हटले आहे. ज्यांना सत्तेसोबत जायचे असेल त्यांनी आपला निर्णय घ्यावा; मात्र पक्षाच्या विचारांशी तडजोड करून इतरांवर दबाव आणू नये, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
पक्षातील लोकप्रतिनिधींना उद्देशून, दबावापुढे न झुकता संविधानाशी द्रोह करणार नाही, हे धाडसाने दाखवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ आमदार आणि खासदारांची मते महत्त्वाची नसून निवडणुकीत रात्रंदिवस मेहनत घेणारे लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांचाही विचार केला पाहिजे, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
राजकारणात सामान्य जनता हरवली; दुष्काळाच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष
राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना गेल्या काही काळात राजकारणाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य जनता राहिलेली नसून सत्ता, पैसा आणि नेते यांनाच अधिक महत्त्व मिळत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील भीषण दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नांवरूनही राजकीय चर्चांमुळे लक्ष विचलित झाले असून सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला पवार साहेबांविषयी आदर आणि प्रेम आहे. पक्षाने जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून एक पाऊल पुढे टाकले, तर जनता दहा पावले पुढे येईल, असा विश्वासही पत्रलेखकाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना आणि पक्षाच्या वैचारिक भूमिकेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
सुप्रिया सुळे यांना थेट साद; आजच भूमिका जाहीर करण्याची मागणी
पत्राच्या शेवटच्या भागात सुप्रिया सुळे यांना अत्यंत भावनिक आवाहन करण्यात आले आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याबरोबरच पक्षाची भूमिका आजच स्पष्टपणे जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी विचारांच्या जनतेला विश्वास मिळेल, असे पत्रात म्हटले आहे.
पक्षाच्या दिल्लीतील घडामोडी माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर असल्याने विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे त्यांच्यावरही टीका होत असल्याचे पत्रलेखकाने नमूद केले आहे. पक्षातील काही लोकांच्या भूमिकेमुळे सुप्रिया सुळे यांची प्रतिमा खराब होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
एक सहकारी आणि कुटुंबातील सदस्य म्हणून हे पत्र लिहित असल्याचे सांगत, साहेबांच्या विचारांचा वारसा अखंड ठेवण्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घ्यावा, अशी शेवटची विनंती करण्यात आली आहे.
एकूणच, डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांच्या भावना, वैचारिक भूमिका आणि राजकीय निर्णयप्रक्रियेबाबतची अपेक्षा या पत्रातून समोर आली आहे. आता या पत्रातील मागणीवर सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



