सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
यंदाच्या ऊस गळीत हंगामात उसाचे घटलेले उत्पादन, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधील वाढती स्पर्धा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च आणि उसाला मिळणारा रास्त दर या सर्व बाबींचा विचार करता, बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन किमान ४,००० पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी भाजपा नेते दिलीप खैरे यांनी केली आहे.
राज्यातील अनेक साखर कारखाने प्रति टन रु ३८०० ते ३,५०० च्या आसपास पहिली उचल देण्याच्या भूमिकेत असताना, साखरेचे दर ५० रुपयांच्या आस पास आहेत. तसेच सोमेश्वर कारखान्याची आर्थिक क्षमता, मागील काही वर्षांतील गाळपाची कामगिरी, गेल्या वर्षीचा 12.27 % साखर उतारा, कर्जाची स्थिती, व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि नीरा खोऱ्यातील ऊस उत्पादनाची परिस्थिती यांचा सर्वंकष विचार करता शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
माळेगाव, छत्रपती आणि सोमेश्वर या बारामती परिसरातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांच्या मागील काही वर्षांतील गाळपाचे आकडे, साखर उतारा, आर्थिक स्थिती, कर्जाचा बोजा आणि व्यवस्थापनाची कामगिरी यांची वस्तुनिष्ठ तुलना करून सोमेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. उसाचा साखर उतारा १२ ते १२.५ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाढत्या दराची पार्श्वभूमी लक्षात घेता, शेतकऱ्यांना रास्त मोबदला मिळणे गरजेचे आहे.
डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीतील उसाला वाढीव पहिली उचल द्या!
कारखान्याचे गाळप जास्तीत जास्त काळ चालावे, उसाची उपलब्धता टिकून राहावी आणि गाळप हंगामाच्या उत्तरार्धात कारखान्याला उसाची कमतरता भासू नये, यासाठी केवळ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत गाळप होणाऱ्या प्रोत्साहन अनुदान देण्याऐवजी हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रोत्साहन देणारी योजना राबविणे आवश्यक आहे. कारण हंगाम मार्च व एप्रिल मध्ये जाणार नाही अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
त्यासाठी पुढीलप्रमाणे वाढीव पहिली उचल देण्याचा प्रस्ताव आहे:
डिसेंबरमध्ये गाळप होणाऱ्या उसाला: प्रति टन ₹१०० अतिरिक्त.
जानेवारीमध्ये गाळप होणाऱ्या उसाला: प्रति टन २०० अतिरिक्त.
फेब्रुवारीमध्ये गाळप होणाऱ्या उसाला: प्रति टन ₹३०० अतिरिक्त. तर मार्चमध्ये ४०० रुपये द्यावे. ही वाढीव रक्कम किमान ४,००० च्या प्रस्तावित पहिल्या उचलीव्यतिरिक्त देण्यात यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासून ऊस कारखान्याला देण्याचे प्रोत्साहन मिळेल आणि कारखान्याच्या गाळपाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. बाहेर मोठ्या प्रमाणात ऊस चालला आहेत त्यास अटकावं बसेल.
१५० दिवसांपेक्षा अधिक गाळप हंगामाचे उद्दिष्ट ठेवा!
यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर १३-१४ लाख टनांपेक्षा अधिक गाळप करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर केवळ ऊस उपलब्धतेवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर तोडणीचे नियोजन आणि पारदर्शक गाळप धोरण यांची सांगड घालावी लागेल.
हंगामाच्या सुरुवातीला ऊस कारखान्याकडे आणण्यासाठी आकर्षक दर देणे, तोडणी व वाहतुकीचे नियोजन सुधारणे आणि शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवणे या उपाययोजनांमुळे कारखाना किमान १५० दिवस किंवा त्याहून अधिक काळ चालविण्याच्या उद्दिष्टाला मदत होऊ शकते.
कारखान्याचे गाळप सातत्याने सुरू राहिल्यास यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षम वापर, स्थिर उत्पादन नियोजन आणि प्रति टन उत्पादन खर्च कमी करण्याची संधी निर्माण होऊ शकते. अर्थात, यासाठी प्रत्यक्ष ऊस उपलब्धता, साखर उतारा, ऊर्जा खर्च, कर्जावरील व्याज आणि इतर आर्थिक बाबींचा विचार करून व्यवहार्य नियोजन करणे आवश्यक आहे.
शेतकरी हित आणि कारखान्याची आर्थिक शिस्त यांचा समतोल साधा!
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा सहकारी उद्योग आहे. त्यामुळे पहिली उचल ठरविताना केवळ इतर कारखान्यांच्या दरांकडे न पाहता स्वतःच्या आर्थिक क्षमतेचा, साखर उताऱ्याचा, उपपदार्थांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि आगामी गाळप खर्चाचा सखोल अभ्यास करावा.
कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकरी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना रास्त दर देतानाच कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत ठेवणे, कर्जावरील नियंत्रण आणि उत्पादन खर्चात बचत करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रमुख मागण्या
१. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी प्रति टन किमान ४,००० पहिली उचल जाहीर करावी.
२. डिसेंबर, जानेवारी, मार्च फेब्रुवारी महिन्यांत गाळप होणाऱ्या उसासाठी अनुक्रमे १००, २००, ३०० व ४०० रु अतिरिक्त पहिली उचल द्यावी.
३. १३ लाख टनांपेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवून किमान १५० दिवस किंवा त्याहून अधिक काळ कारखाना चालविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे.
४. माळेगाव, छत्रपती आणि सोमेश्वर कारखान्यांच्या गाळप, साखर उतारा, कर्ज व आर्थिक कामगिरीची तुलनात्मक माहिती सभासदांसमोर पारदर्शकपणे मांडावी. तशी श्वेतपत्रिका काढावी.
५. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर तोडणी, पारदर्शक वजन, वेळेवर ऊस बिल आणि योग्य दर यांची हमी देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
यंदा उसाचे उत्पादन कमी असताना शेतकऱ्यांचा ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा करायची असेल, तर शेतकऱ्यांना रास्त दर आणि सुरुवातीपासून प्रोत्साहन देणारी उचल देणे ही काळाची गरज आहे. सोमेश्वर कारखान्याने शेतकरी हिताला प्राधान्य देत किमान ₹४,००० पहिली उचल आणि हंगामाच्या सुरुवातीच्या महिन्यांसाठी वाढीव उचल जाहीर करावी, तिन्ही कारखाने एकाच नेतृत्वाखाली असले तरी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. अन्य कारखान्यासाठी सोमेश्वरच्या शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. त्यामुळे सोमेश्वरचेच गाळप कमी होईल. असे खैरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटलें आहे.



