गुळुंचे येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड
गावातील तरुणांच्या मदतीने डोंगर व माळरानावर अन्न व पाण्याची सोय
निरा- दि २१
एकीकडे लॉकडाऊन सुरू असताना सोशल डिस्टन्स पाळत व मास्क तोंडाला लावून गुळुंचे (ता.पुरंदर) येथील शिक्षक बंधू प्रवीण व प्रशांत जोशी यांच्यासह काही तरुण डोंगर व माळरानावर पक्षांना अन्न व पाणी ठेवत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत असुन अनेकांनी या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले. सध्या उन्हाळा सुरू असून सुगीही संपली आहे. त्यामुळे पक्षांना अन्न व पाणी उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील पोलीस पाटील दीपक जाधव, संजय चव्हाण, निखिल खोमणे, विनोद गोरगल, सचिन पाटोळे, संदीप काळे या तरुणांनी पुरंदर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील रुपाडी डोंगर व माळरानावर पक्षांना अन्न व पाणी झाडावर टांगून ठेवण्यास सुरुवात केली. यासाठी तरुणांना कोतवाल नारायण भंडलकर यांचेही सहकार्य मिळत आहे. सध्या दशक्रिया विधींचे घाट ओस असून यासाठी फार कमी प्रमाणात लोक उपस्थिती लावतात. हे लक्षात घेऊन कवळ्यांसाठी भाताचे पिंड तयार करून ठेवण्यास या तरुणांनी सुरुवात केली आहे. जोशी बंधू यासाठी स्वतः पिंड ठेवत असून हे तरुण रोज पायपीट करत चिमण्या व रानपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रवीण जोशी हे सातारा जिल्हा परिषदेत माण तालुक्यात प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे विविध सामाजिक कामात योगदान असते. तर त्यांचे बंधू प्रशांत हे पुण्यातील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत शिक्षक आहेत.
-"*मानवाची जीवनशैली समृद्ध होत असताना पक्षी, वन्यजीव यांचे अधिवास सुरक्षित राहून त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही सध्या पक्ष्यांसाठी काम करत असून तरुणांच्या संघटनेकडून अन्नधान्य वाटप करणे, मास्क तयार करणे सुरू आहे. "- प्रशांत जोशी, माध्यमिक शिक्षक, राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा पुणे.
COMMENTS