सोमेश्वरनगर- प्रतिनिधी
येथील परिसरात अद्याप एकही कोरोना ग्रस्त रुग्ण नाही परंतु तरीही काही समाजकंटकांनी एक कोरोनाग्रस्त असल्याची अफवा पसरवली आहे. यामुळे लोकांमध्ये भय तर पसरले आहेच पण आरोग्य आरोग्यसेवा करणारी कुटुंबेही मानसिक दृष्ट्या खचू लागली आहेत. कोरोनाचा देशात प्रादुर्भाव झाल्यापासून सोमेश्वरनगर पंचक्रोशीत अद्यापही एकही रुग्ण नाही. त्यास आरोग्य विभागाने दुजोरा दिला असून अफवा न पसरविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस, आरोग्य विभाग अत्यंत जोमाने काम करत असून त्यांना बारामती तालुका पत्रकार संघ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,आजी माजी सैनिक संघटना यांची मोलाचे सहकार्य होत आहे. परिसरात स्थलांतरित आणि परप्रांतीय मजुरांना अनेक समाजसेवक गटातून धान्य व किराणामालाची मदत करत आहेत. अशी परिसरात चांगली परिस्थिती असताना काही समाजकंटक मात्र अफवा पसरून लोकांमध्ये भय निर्माण करण्याचे काम करत आहेत.
येथील परिसरात आरोग्य खात्यात काम करणारे काही सेवाभावी तरुण आघाडीवर राहून आरोग्य विभागाच्या मार्फत लोकांची सेवा करत आहेत. त्यांच्या सेवेची आरोग्य विभागात कौतुकही होत आहे. परंतु नेमक्या याच आरोग्य सेवकांना लोकांच्या अफवाचा त्रास होऊ लागला आहे. एक आरोग्य सेवक कोरोना बाधित झाला आहे अशी अफवा परिसरात पसरविण्यात आली आहे. यामुळे सेवा करणारे हे कुटुंब मानसिक दृष्ट्या हतबल झाले आहे. या कुटुंबाला समाजाकडून आधाराची गरज असताना त्यांना प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सदर कुटुंबातील अथवा गावातील कोणीही व्यक्ती कोरोना बाधित झालेली नाही. किंवा सध्या कोणी संशयित ही नाही. एवढेच नव्हे सोमेश्वर नगर परिसरात अद्याप एकही पूर्ण बाधित रुग्ण सापडला नाही किंवा सद्यस्थितीत कुठलाही संशयित आरोग्य विभागाने ताब्यात घेतलेला नाही.
सोमेश्वरनगर परिसरात अथवा शेजारील गावांमधून एकही रुग्ण बाधित नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, बारामती
COMMENTS