लोणीभापकर माध्यमिक विद्यालयात पालकसभा संपन्न
लोणीभापकर : प्रतिनिधी
येथील न्यू इंग्लिश स्कूल याठिकाणी नुकतीच पालक सभा आयोजित करण्यात आली होती. शाळा सुरू करण्यासंदर्भात ही पालक सभा घेण्यात आली होती. यामध्ये शाळेने, पालकांनी व ग्रामपंचायतीने कोणती काळजी घ्यायची या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. लोणी भापकर येथील पालकांनी शाळेला आवश्यक असणाऱ्या वस्तू लोकवर्गणीतून वैयक्तिक स्वरूपात देण्याचे कबूल केले. २ जुलैपासून इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्ट पासून पाचवी ते आठवी आणि अकरावी हे उर्वरित वर्ग चालू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्या तसेच शाळेचा सर्व परिसर हायपोक्लोराईड या लिक्विडचा वापर करुन त्याची फवारणी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये शाळा चालू झाल्यानंतर पालकांनी आणि शाळेने मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यांना शाळेत लावताना तोंडाला मास्क लावलेले असावे त्याचबरोबर शाळेत आल्यानंतर सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण यांची सोय करण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.
याप्रसंगी शाळेसाठी मान्यवर, शिक्षक तसेच पालकांनी रोख स्वरूपात व वस्तू स्वरूपात मदत करण्याचे जाहीर केले. यावेळी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सहसचिव विजयसिंह भापकर, पळशीचे सरपंच रावसाहेब चोरमले, सायंबाचीवाडी उपसरपंच प्रमोद जगताप, लोणीभापकरचे सरपंच रविंद्र भापकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप, आजी माजी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
COMMENTS