निरा डाव्या कालव्याला भगदाड
संतोष भोसले
वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथे निरा डावा कालवा फुटला. छोट्या गळतीचे रूपांतर मोठ्या प्रवाहात झाले परिणामी कालव्याला भगदाड पडले. यामुळे तातडीने कालवा बंद करावा लागला. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते.
सध्या पाऊस पडत असल्यामुळे कालव्याचे पाणी शेतीला फारशी लागत नसले तरी परिसरात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे यामुळे कालव्याच्या पाण्यावर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अचानक बंद पडलेल्या कालव्यातील पाण्यामुळे तारांबळ उडाली.
गेल्या अनेक दिवसापासून येथिल मोरी लगत पाण्याची गळती होती पण याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते परिणामी गळतीचे रूपांतर फुटीत झाले गुरुवार ता. 11 सायंकाळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला याबाबतची माहिती दिली.
कालवा निरीक्षक शरद मोरे पाटबंधारे शाखाधिकारी बाजीराव पोंद्कुले यांनी घटनास्थळी येऊन तात्पुरती उपाययोजना केल्या पण याचा काही फायदा झाला नाही. उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे यांनी तातडीने कालव्यातील प्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न केले. गुरूवार 750 क्यू सेक्सने पाण्याचा विसर्ग कालव्यांमधून चालू होता तो कमी करून 400 क्युसेक्स करण्यात आला. परंतु यावरही गळती न थांबल्याने शुक्रवार दि. १२ कालवा पुर्ण बंद करण्यात आला. शनिवार दि. १३ पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर गळती थांबविण्यात यश येऊ लागले रविवार दि. १४ भरावाला आतून काँक्रीट करत काम करण्यात आले. या परिसरात कालव्याला भगदाड पडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्यावर्षी मोरीच्या पुढच्या तोंडाला भगदाड पडले होते, यावेळी मागच्या तोंडाला भगदाड पडले आहे. पाटबंधारे विभागाकडून यावेळी दुरुस्ती होत नसल्याने असे प्रकार घडले आहेत.
COMMENTS