सोमेश्वर विद्या प्रतिष्ठानने चालू शैक्षणिक वर्षात फी वाढ करू नये : पालकांचे निवेदन.
-उपमुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात शाळांचा फी दरवाढीचा अट्टहास
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान चे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कुल ने चालू शैक्षणिक वर्षांत फी वाढ करू नये, याबाबत पालकांनी शाळेचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर इंग्लिश मीडियम शाळेने चालू शैक्षणिक वर्षात सर्वसाधारणत: जवळपास सात हजार रुपयांची फी वाढ केली असून राज्य शासनाचा कोणत्याही शाळेने फी वाढ करू नये असा शासनाचा अध्यादेश असतानाही शाळेने वाढवलेल्या फी बाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकांनी शाळेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू या आजाराचा संसर्ग सुरु असून सध्या महाराष्ट्र राज्यात दि. २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु आहे. या जागतिक महामारीच्या काळात सर्व उद्योगधंदे, व्यवसाय इ. बंद असून शेतीमालाच्या संदर्भातील बाजारपेठा बंद आहेत. सर्वसामान्य माणसांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार बंद किंवा काही अंशी कपात झालेली असून आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता ग्रामीण भागातील सर्वसामान्य पालकांना नियमित फी भरणेसुद्धा कठीण असताना शाळेने मागील वर्षाच्या शुल्कात ४० % इतकी अवाजवी वाढ केलीअसून ही फी भरण्याच्या सूचना व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार केल्या जात आहेत. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. ८ मे २०२० रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ न करणेबाबत आदेश जारी केला आहे. सदर परिपत्रकात खालील गोष्टी नमूद केलेल्या आहेत जसे की, शा. प. संकीर्ण २०२०/प्र.क. ३३/ एसएम-६ दि. ३०.३.२०२० नुसार व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फीजमा करण्याबाबत सक्ती करु नये, शै. वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय शुल्क पालकांच्या सोयीने मासिक / त्रैमासिक जमा करावी, शै. वर्ष २०२०-२१ साठी कोणतीही फी वाढ करु नये, शुल्क कमी करणेसाठी पालक कार्यकारी समितीची e-PTA बैठक घेऊन ठराव करता येईल, शासन आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या वर्गासाठी लागू असेल.
वरील शासन आदेशातील तरतुदीनुसार शै. वर्ष २०२०-२१ साठी आपण केलेली फी वाढ रद्द करुन मागील वर्षीचे नियमित शुल्क भरण्यासाठी पालकांना मासिक किंवा त्रैमासिक शुल्क भरण्याची परवानगी द्यावी. या संदर्भात आपण पालक शिक्षक कार्यकारी समितीच्या बैठक दि. ०६. ०७.२०१९ व विद्या प्रतिष्ठान मुख्य कार्यकारी समितीची बैठक दि. २४.०७.२०१९ या दोन्ही बैठकीतील ठरावाबाबत फेरविचार करुन संस्था पदाधिकाऱ्यांच्या संमतीने झालेली शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी करुन ७० पालकांच्या सह्या असलेले निवेदन प्राचार्य सचिन पाठक यांच्याकडे देण्यात आले.
.
COMMENTS