मृत महिलेचा मृतदेह ३० तास उलटूनही ताब्यात नाही
लोणंद : प्रतिनिधी
प्रशांत ढावरे
लोणंद येथील प्रभाग क्रमांक बारा मधील एक जेष्ठ महिला सातारा येथील सीव्हील हॉस्पिटल मधे उपचारा दरम्यान रविवारी रात्री मृत झाली. मात्र अजूनही सदर महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही.
रविवारी दुपारी लोणंद येथील महिला ( वय 65 ) यांना अत्यवस्थ वाटत असल्याने लोणंद मधील खासगी रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांनी सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याने रूग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सातारा येथील सिव्हिल हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी रविवारी रात्री ऊशीरा उपचारा दरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅब घेतला असून सुमारे तीस तास उलटून गेले तरीही रिपोर्ट आला नसल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला आहे. यामुळे नातेवाईकांच्यात असंतोष वाढतो आहे. सदर मृत महिलेचे दोन मुले व एक मुलगी रविवार पासून भूक तहानेने व्याकूळ अवस्थेत हाॅस्पिटल मधे मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी थांबलेले आहेत. हाॅस्पिटल प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळेच रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरीत लक्ष देऊन मृतदेहाची हेळसांड थांबवावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
COMMENTS