निरा शहरात कोरोना संशयित रुग्णांची अफवा : अफवांवर विश्वास ठेवू नये
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात कोरोना पेशंटची संख्या ३५६ झाली असल्याने चिंता वाढत आहे. सासवड, जेजुरी व इतर गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्या असलेल्या निरा शहरातील ग्रामस्थांमध्ये शुक्रवार पासून वेगवेगळ्या अफवांचा पेव फुटला होता. निरा शहरातून गुरुवारी एका कुटुंबाला फक्त लो रिस्क कॉन्टॅक्ट मधील असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. हे कुटुंब मूळचे पुरंदर तालुक्यातील पिसर्व येथील असून त्यांचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे.
याशिवाय रविवारी सकाळ पर्यंत एकही कोरोना लक्षणे असलेला रुग्ण तपासणीसाठी अथवा गावाबाहेरील दवाखान्यात पाठवीण्यात आला नसल्याची प्राथमिक आरोग्य केंद्र कडून सांगण्यात आले आहे. मात्र आजही निरेतील लोक बेफिकिरीने वागत असतात. सार्वजनिक ठिकाणी येताना किंवा रस्त्यावर फिरताना मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. पहाटे किंवा संध्याकाळी फिरताना लोक विशेषतः महिला मास्क घालून फिरत नाहीत; तर शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावर चक्क युवक विना मास्क पाणी घेण्यासाठी येतात यावर ग्रामपंचायतीने अंकुश आणला पाहिजे.
पुरंदरमध्ये कोरोनाने द्विशेतकी मजल मारली आहे. त्यामुळे गावागावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांचे सासवड, जेजुरी, पुणे इतरत्र येणे-जाणे सुरू असते तर काही लोक नोकरी धंदा निमित्त सासवड पुणे येथे जात असतात. या लोकांसह इतर गावातील लोकांनाही आता काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये आपल्या गावात कोणी रुग्ण आहे का ? किंवा आढळला आहे का ? याची माहिती जाणून घेण्यासाठी हे लोक माध्यमांच्या प्रतिनिधींना सतत फोन करत असतात व खात्री करून घेतात आहेत. असाच काहीसा प्रकार मागील दोनदिवसात दिसून आला निरा येथील प्रभाग ४ मधील संशयीतांच्या रिपोर्ट बाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. यामुळे जोरदार अफवा दिवसभर सुरू होत्या. तर काही इमारती ही सिल केल्याची मोठी अफवा ग्रामीण भागांमध्ये होती. अगदी प्रभाग क्रमांक ४ मधिल कामगारांनाही कंपनीत मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या वृत्ताला पुष्टी मिळत गेली मात्र हे रुग्ण आज निगेटिव्ह आल्याने या सर्व अफवांवर पाणी पडले आहे. हे कुटुंब ज्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते त्य घटनेला आता १४ दिवस झाले आहेत. आज या कुटुंबाचे व्यवसाय असलेले दुकान उघडे आहे.
वेगवेगळ्या अफवांची खात्री माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन-तीन दिवसात एकही संशयित रुग्ण सासवड, जेजुरी किंवा पुणे येथील कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात आला नसल्याचे खात्रीलायक वृत्त त्यांनी दिले आहे. कोणाही व्यक्तीला करोनाची लक्षणे आज रोजी तरी दिसत नाहीत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. निश्चिंत राहावे आज रोजी पर्यंत निरा शहर करोनाच्या दृष्टीने सेफ शहर असल्याचे त्यांनी सांगितले.
निरा येथील बाजारपेठ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत शनिवार सोडून नियमीत सुरू राहणार आहे. याकाळात व्यापाऱ्यांनी व येणाऱ्या ग्राहकांनी कोरोना संदर्भ घालून दिलेले नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे. निरा शहरात येणार्या लोकांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. दुकानांमध्ये किंवा बँकेमध्ये सोशल डिस्टंसिंग तंतोतंत पालन करावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी दिवसभर बाजारपेठेमध्ये फिरते राहतील मास्क न लावलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. आजही निरा येथील प्रभाग क्रमांक ३ मंदिर विठ्ठल मंदिराच्या आवारातील शुद्ध पाणीपुरवठा केंद्रावर लोक विना मास्क पाणी आणण्यासाठी येत आहेत या लोकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही अथवा उपस्थित लोक अशा लोकांना हटकत ही नाहीत कृपया विना मास्क पाणी आणण्यासाठी आलेल्या लोकांना तेथील कर्मचाऱ्यांनी किंवा शेजाऱ्यांनी हटकणे गरजेचे आहे मास्क लावून आले तरच पाणी द्यावे.
COMMENTS