बीलासाठी २४ तास दवाखान्याने अडकवून ठेवलेला मृतदेह अजितदादांच्या एका फोनवर नातेवाईकांच्या ताब्यात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथील वैशाली सुमित जाधव यांचे तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.बिल भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही असे दवाखाना प्रशासनाने सांगितले.चोवीस तास जाधव यांचा मृतदेह दवाखान्यात होता ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना समजल्यावर त्यांनी संबंधिताना फोन केला.त्यांच्या फोननंतर चोवीस तासांनी जाधव यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला.
बारामती तालुक्यातील मुरूम येथील वैशाली जाधव ह्या बाळंतपणासाठी सोमटाने फाटा येथील दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. या दवाखान्यात उपचार घेत असताना तिथल्या सीझर करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जाधव यांनाही कोरोना झाला. त्यांचे कोरोनाचे निदान झाल्यावर त्यांना तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परवा त्यांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. या नंतर "90 हजार रुपये भरा तेव्हा आंम्ही मृतदेह ताब्यात देऊ." अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यामुळे जाधव यांचे नातेवाईक सैरभैर झाले.त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याना बिल भरणे शक्य नव्हते.जवळचे पैसे उपचारासाठी संपून गेले होते. काय करावे हे त्यांना समजेना मग त्यांनी सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शैलेंद्र रासकर यांना फोन करून आपली कैफियत मांडली. रासकर यांनी ही गोष्ट अजित दादा यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांना सांगितली. सुनील मुसळे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला फोन करून संबंधित प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप दवाखाना प्रशासनाला फोन करून 'दहा मिनिटात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्या.' असे सांगितले. आणि त्यानंतर वैशाली जाधव यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला.
COMMENTS