गुळूंचे येथील श्रावणातील पहिल्या सोमवारचा रथोत्सव रद्द : पोपटराव निगडे
पुरंदर : प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्व देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. श्रावण महिन्यामध्ये देवस्थानांची विविध उत्सव समारंभ असतात या उत्सवांवर बंदी आणण्यात आली आहे. तर काही देवस्थानांनी स्वयंशिस्त पाळत हे उत्सव रद्द केले आहेत. पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील प्रसिद्ध असलेले श्री ज्योतिर्लिंग देवस्थान यांचा श्रावणातील पहिल्या सोमवारी असणारा रथोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त पोपटराव निगडे यांनी दिली आहे.
राज्यभर 'काटेबारस' यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंग देवस्थान हे महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्रचा 'ब' दर्जा असलेले देवस्थान. वर्षभरात वेगवेगळे उत्सव येथे साजरे केले जातात त्यापैकीच एक श्रावण महिन्यात पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लींगाची उत्सव मूर्ती नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नानासाठी जातात. यावेळी गुळूंचे येथील श्री ज्योतिर्लिंग महाराज व कर्नलवाडी येथील श्री ज्योतिबा महाराज यांच्या उत्सव मूर्ती पालखीमध्ये ठेवून चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढत नीरेडे निघतात व दुपारच्या वेळेत स्नान झाल्यानंतर नीरा बाजारपेठेमध्ये भव्य मिरवणूक असते. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उत्सव मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी नीरे मध्ये गर्दी करत असतात. अखंड सुरू असलेली ही रथोत्सव परंपरा यावर्षी पहिल्यांदाच खंडित होताना दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या शक्यतेने असे उत्सव साजरे करू नयेत असे महाराष्ट्र शासनाचे निर्देश असल्याने त्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
श्रावणा महिन्यामध्ये मध्ये शिवालायांमध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करण्याची परंपरा आहे. तशीच परंपरा ज्योतिर्लिंग देवस्थानाची ही आहे. गावातील युवक मोठ्या संख्येने श्रावण महिन्यामध्ये उपवास करतात व ज्योतिर्लिंगाच्या स्वयंभू पिंडी वर अभिषेक करतात. यावेळी नोकरी कामधंद्या निमित्त परगावी गेलेले युवक आवर्जून अभिषेक करण्यासाठी सोमवारी येत असतात. यावर्षी असे कोणतीही अभिषेक घातले जाणार नसून संपूर्ण मंदिर परिसर भाविकांसाठी बंद राहणार आहे. कृपया कोणीही दर्शनासाठी मंदिर परिसरात येऊ नये असे अहवाल देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव आहे. मंदिराच्या तिन्ही द्वारांवर बंद करण्यात आले आहेत. तरी भाविक भक्तांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणे टाळावे असे आव्हान देवस्थानचे विश्वस्त जयसिंग निगडे यांनी केले आहे.
चंदा दशरथ निगडे : उपसरपंच गुळूंचे
'ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या विश्वस्तांनी श्रावणातील सर्व धार्मिक विधी रद्द केल्या आहेत. त्यामुळे देवस्थानाच्या परिसरामध्ये कोणीही जमू नये. गर्दी करू नये. गावामध्ये व मंदिर परिसरामध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. परिसरामध्ये एकत्रित येऊन गप्पागोष्टी करू नये, तसे केल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.'
COMMENTS