दंडाच्या रकमेतून व्यापारी संघटनेचा नसरापुमध्ये विधायक उपक्रम
भोर : प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर दिलेल्या वेळापत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रक्कमेतून नसरापूर व्यापारी संघटनेच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी सामाजिक जाणीव ठेऊन शरीरातील तापमान व रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजणीसाठी प्लस ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर नसरापूर ग्रामपंचायतीला ( ता. भोर ) भेट देण्यात आले असून नागरिकांची दररोज तपासणी करण्यात येणार आहे.
नसरापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अभय निकम यांच्याकडे प्लस ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर नसरापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल गयावळ, उपाध्यक्ष रमेश कदम, प्रदीप राशिनकर, राहुल देशपांडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे सचिव वैभव भूतकर, पत्रकार किरण भदे, ज्ञानेश्वर झोरे, अजिंक्य हाडके, इरफान मुलाणी आदी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून ग्रामस्थांची व व्यापारी बंधूंची नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य तपासणी सामुग्री देण्यात आल्याचे अध्यक्ष अनिल गयावळ यांनी सांगितले तर गुरुवार दि. ३० पासून नियमित आरोग्यसेवकच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करणार असल्याचे ग्रामसेवक अभय निकम यांनी सांगितले.
COMMENTS