बोरकरवाडीत आढळल्या दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह
सुपे : दीपक जाधव प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी ( दि.१९ ) उघड झाले. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांची कोरोना चाचणी रुई ग्रामीण रुग्णालयात घेण्यात येणार असल्याची माहिती मोरगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी दिली.
मागिल आठवड्यात बोरकरवाडी येथील रुग्णास ह्रदयाच्या आजाराबाबत उपचारासाठी चिंचवड येथे दाखल केले होते. त्यानंतर ते गावी आले, मात्र त्यांच्यासह पत्नी आणि सुन यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसापुर्वी चिंचवड येथे उपचारासाठी गेले होते. या तिघांची कोरोना चाचणी केल्यावर दोन्ही महिलांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील आठ जणांची कोरोना चाचणी रुई येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अनिल वाघमारे यांनी दिली.
या अगोदर चार दिवसापुर्वी येथील ८० वर्षीय पुरुषाची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्यानंतर त्या व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या १३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यावेळी मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. वाघमारे यांनी केले आहे.
................................................
COMMENTS