एकनाथ खडसे यांना माझ्या शुभेच्छा : रामदास आठवले
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादीत जात असल्याची माहिती मिळाली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र त्यांना दुसऱ्याच पक्षात जायचे होते तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये यायला हवे होते असे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
बारामती तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खासदार आठवले बारामतीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की केंद्राकडून राज्याला मदत मिळेलच मात्र राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करत नुकसान ग्रस्त लोकांना मदत केली पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल विचारले असता आठवले म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जात असल्याचे कळाले. मात्र ते एकटेच जातील. त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार जातील असे वाटत नाही. शरद पवार त्यांना राष्ट्रवादीत घेतील. विधानपरिषदेत आमदार ही करतील. त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. एकनाथ खडसे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यांना जर पक्षच सोडायचा होता तर त्यांनी राष्ट्रवादीत न जाता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश करायला हवा होता. त्यांचे आम्ही स्वागतच केले असते असे ते म्हणाले.
COMMENTS