सदस्यांची बेकायदेशीर कामे न केल्यामुळे माझी तक्रार : त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती) येथील सरपंच व सदस्यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून त्यांची बेकायदेशीर कामे न केल्यामुळेच नाराज होऊन त्यांनी माझी तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती वाणेवाडीचे ग्रामविकास अधिकारी पी. गाढवे यांनी दिली. याबाबत गाढवे यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत आपले म्हणणे सादर केले आहे.
मंगळवारी(दि.२०) रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराला वैतागून कार्यालयाला टाळे ठोकले होते. वाणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये बहुतांश सदस्य हे ठेकेदार आहेत. ग्रामपंचायती अंतर्गत येणारी कामे हे सदस्य करत आहेत. वाणेवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या विकासनगर येथील बंदिस्त गटाराचे काम त्यांना न दिल्याने व कामाचा निधी काढून न दिल्याने त्यांनी रागाच्या भरात तक्रार दाखल केली असल्याचे गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत मी दररोज ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत ग्रामपंचायत अधिनियमानुसार काम करीत आहे. सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असून ग्रामपंचायत सदस्य विकासकामात आडकाठी आणत आहेत.
दरम्यान वाणेवाडीच्या युवकांनीही ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून ग्रामपंचायतीच्या इतिहासात आजपर्यंत असे झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून तक्रार करणार असल्याचे सांगितले.
COMMENTS