'सोमेश्वर' व 'माळेगाव' कारखान्याचा आदर्श राज्यातील इतर कारखान्यांनी घ्यावा - तात्यासाहेब काळे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्याने कामगार हिताचे चांगले निर्णय घेतले आहेत, या दोन्ही कारखान्यांनी कामगारांना हुद्देवारी देऊन कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी व्यक्त केले.
निंबुत ता बारामती येथे ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयात बारामती तालुका साखर कामगार सभेचे आयोजन केले होते त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा साखर कामगार समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र तावरे, बारामती साखर कामगार सभेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, सोमेश्वर पतसंस्था अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, संतोष भोसले, तानाजी सोरटे, हनुमंत भापकर, रवींद्र तावरे, राजेंद्र जगताप, शरद चव्हाण, रमेश कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. काळे पुढे म्हणाले, या कारखान्याकडे कामगारांची कोणतेही देणी राहिली नाहीत, बोनस देखील उच्चाकी दिला आहे. त्यामुळे राज्यातील इतर साखर कारखान्याने या दोन साखर कारखान्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच साखर कामगारांच्या वेतन मंडळाची मुदत संपल्याने लवकरच जेष्ठ नेत्यांशी तसेच कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांच्याशी चर्चा करून लवकरच त्रिपक्षीय समिती गठीत करून वेतन वाढीचा निर्णय घेतला जाईल असे काळे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बाळासाहेब गायकवाड, प्रमोद खलाटे, प्रमोद थोपटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कैलास जगताप यांनी मानले.
COMMENTS