बारामतीतील चार रुग्णालयांवर कारवाई : जादा बिल आकारणी प्रकारण
बारामती : प्रतिनिधी
शहरातील चार खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून जादा बिले आकारल्याचे समोर आले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या बिलांच्या तपासणीत ही बाब उघड झाली. यामुळे सुमारे ३६ लाखांची रक्कम या रुग्णालयांनी परत करावी, असे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. यासंबंधी रुग्णालयांना नोटीसा बजावणार, असल्याचेही प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.
शहरातील चार रुग्णालयांनी जादा बिले आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण १६ रुग्णालयांतील बिलांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढणार असून जादा बिले आकारली गेली असल्यास रुग्णांना ती परत मिळणार असल्याचे प्रांताधिकारी कांबळे म्हणाले. खासगी रुग्णालयाच्या बिलांची तपासणी प्रांताधिकाऱ्यांनी नेमलेल्या लेखापरीक्षकांनी केली. यामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम या रुग्णालयांनी आकारल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम रुग्णालयांनी रुग्णांना परत करावी, यासाठी नोटीसा बजावल्या जाणार आहेत. त्यांनी ती परत न केल्यास दंड अथवा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी म्हणाले. शासनाच्या आरोग्य विभागाने २१ मे व ३१ ऑगस्टला बिलासंबंधी अधिपत्रक काढले होते. शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारणी करावी, असेही या अधिपत्रकात नमूद करण्यात आले होते. तरीही खासगी रुग्णालयांकडून अवाच्या सव्वा बिल आकारणी झाली आहे. शहरातील जवळपास १६ रुग्णालयांतील बिले प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत. चार रुग्णालयांची छाननी पूर्ण झाली. त्यात जवळपास ३६ लाख रुपये अधिक घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
COMMENTS