महाराष्ट्रातील सहकार अनुकरण करण्यासारखा : तेलंगणा कृषीमंत्री निरंजन रेड्डी

Admin
महाराष्ट्रातील सहकार अनुकरण करण्यासारखा : तेलंगणा कृषीमंत्री  निरंजन रेड्डी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

तेलंगणा राज्यात १५ साखर कारखाने असून सर्वच कारखाने खाजगी आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने पाहण्यासारखा आहेत. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे तेलंगणा सरकार निश्चित अनुकरण करणार असल्याचे मत तेलंगणा राज्याचे कृषिमंत्री  निरंजन रेड्डी यांनी व्यक्त केले. 
             तेलंगणा राज्याचे कृषिमंत्री के. निरंजन रेड्डी गेले दोन दिवस बारामती दौऱ्यावर असून काल त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली तर आज सोमेश्वर कारखान्याला भेट देऊन सहकाराची माहिती घेतली. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि तेलंगणा शेती अभ्यासक उपस्थित होते.
        रेड्डी पुढे म्हणाले, तेलंगणात उसाची बिलाची शाश्वता नाही. बहुतांश कारखाने एफआरपी देखील पूर्ण करत नाहीत. आणि उसाला दर मिळत नसल्याने उसाच्या पिकाकडून शेतकरी इतर पिकाकडे वळत आहेत. त्यामुळे तेलंगणा कृषी मंत्रालयाचा मानस आहे की महाराष्ट्रासारखे तेलंगणात सहकारी साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे कसे मिळतील. 
             यानंतर त्यांनी सोमेश्वर कारखान्याचा कारभार कसा चालतो याची माहिती घेतली. अकाउंट विभाग, कामगार किती, सभासद किती, ऊसदर किती दिला, कामगार बोनस, साखर कशी तयार होते, सहवीजप्रकल्प, डिस्टलरी या सगळ्यांची माहिती घेतली. तसेच जानेवारी महिन्यात तेलंगणाच्या शंभर शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी सोमेश्वर कारखान्यावर घेऊन येणार असल्याचे कृषीमंत्री रेड्डी यांनी सांगितले. 

सोमेश्वर च कौतुक----------
एकीकडे तेलंगणा राज्यात खाजगी कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कमही अदा करत नाहीत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सोमेश्वर सारखा सहकारी साखर कारखाना एफआरपी पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना अदा करत असल्याने रेड्डी यांनी चेयरमन आणि संचालक मंडळाचे कौतुक केले.
To Top