'सोमेश्वर' चा अतिरिक्त ऊस जाणार 'दौंड शुगर' आणि 'जरंडेश्वर' ला
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज----------
यावर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अधिकचा ऊस आहे. अनेक कारखान्यांशी संपर्क केला. मात्र आमचा ऊस संपल्यावरच तुमचा घेऊ असे कारखाने सांगत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी दौंड शुगर आणि जरंडेश्वर अशा कारखान्यांमार्फत जादा ऊस नेण्याची तयारी दाखविली असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
वाणेवाडी (ता. बारामती) येथे रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने संस्थापक कै. रामराजे जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आळा. याप्रसंगी अध्यक्षीय स्थावरून जगताप बोलत होते. यावेळी कामगार नेते तुकाराम जगताप, रामचंद्र जेधे, बाबाबासाहेब भोसले, उत्तम भोसले, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, बारामती तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, शरद चव्हाण, शामराव धुमाळ, राजेंद्र बरकडे उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले, सोमेश्वर चा अतिरिक्त ऊस नेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्यामुळे सभासदांना दिलासा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे पुढील हंगामासाठीही (२०२१-२०२२) आताच ३३ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. लागवड कार्यक्रम अद्याप सुरू असून नोंद चाळीस हजार एकरांवर जाईल. दहा लाखांची क्षमता असताना सोळा लाख टन ऊस गाळप कसा करायचा हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे पुढील हंगामापर्यंत कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे जगताप यांनी सांगितले.
COMMENTS