शालाबाह्य मुलांचा 'वाटसखा' अनिल चाचर यांना रामराजे स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीचे पहिले सभापती कै. रामराजे जगताप यांच्या स्मृतिनिमित्त रामराजे सोसायटीकडून विशेष सामाजिक योगदानाबद्दल दरवर्षी 'रामराजे स्मृतीगौरव पुरस्कार' दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार शालाबाह्य मुलांचा वाटसखा बनलेल्या व शेकडो मुले शाळेच्या प्रवाहात आणणाऱ्या अनिल दत्तात्रय चाचर (जि. प.शाळा हनुमानवस्ती-वाल्हे) या प्राथमिक शिक्षकांना देण्यात आला.
वाणेवाडी (ता. बारामती) येथे रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने संस्थापक रामराजे जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. कामगार नेते तुकाराम जगताप, रामचंद्र जेधे, बाबाबासाहेब भोसले, उत्तम भोसले, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, बारामती तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, शरद चव्हाण, शामराव धुमाळ, राजेंद्र बरकडे उपस्थित होते. आसाम रायफल्समध्ये निवड झाल्याबद्दल मोनिका पवार हीच तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गणेश सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, शाळेच्या बाहेर जी मुले फेकली गेली आहेत त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या पालकांना समजावून सांगून त्यांना शाळेपर्य़ंत आणणे आणि टिकवून ठेवणे हे अवघड काम चाचर करत आहेत त्यांना मनापासून सलाम. सचिव किरण जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उद्योजक राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. तर सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी आभार मानले.
COMMENTS