'सोमेश्वर' सह पुन्हा अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्च पर्यंत लांबणीवर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्याच्या सहकार विभागाने आज नव्याने काढलेल्या आदेशानुसार सोमेश्वर, छत्रपती, घोडगंगा अशा कारखान्यासह राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यांच्याच निवडणुका होणार आहेत.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस ठरावांसाठी सुरू असलेल्या इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले आणि राज्यातील सर्वच निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. ज्या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यांचा निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तीन महिने या संस्थांना मुदतवाढ दिली होती. तीन महिन्यांची मुदत संपल्याने पुन्हा या निवडणुकांना तीन महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नूतन वर्षात केव्हाही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती.
त्यानुसार मंगळवारी (ता.१२) सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढण्यात आले; मात्र या शासन निर्णयाची शाई वाळते न वाळते तोपर्यंत लगेच आज पुन्हा या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार आता ३१ मार्च २०२१ पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
COMMENTS