शाळाबाह्य मुलांचा वाटसखा अनिल चाचर यांना प्रतिष्ठेचा 'रामराजे' स्मृती गौरव पुरस्कार जाहीर
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------
शाळाबाह्य मुलांचा वाटसखा असलेल्या, वंचित व मागास मुलांना बोटाला धरून शाळेच्या प्रवाहात आणणाऱ्या अनिल दत्तात्रय चाचर या प्राथमिक शिक्षकास रामराजे स्मृतीगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
रविवार २४ तारखेला या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण होणार असल्याची माहिती, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व रामराजे सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी दिली.
अनिल चाचर हे पुरंदर तालुक्यातील मावडी क.प. या गावचे रहिवासी असून सध्या हनुमानवस्ती जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी रुपाली चाचर यादेखील दौंडज जिल्हा परिषद शाळेत आदर्श काम करत आहेत.
चाचर यांनी सुधागड तालुक्यातील सेवेची सुरवात केली. टोपवाडी गावात पालकांशी सहा महिने संवाद केल्यावर तेथील पहिली पिढी शाळेत आली. ३१ चा पट ५७ वर नेला. सहा वर्ष काळात केलेल्या सेवेमुळे आजही तेथील मुले चाचर याना समारंभास निमंत्रित करतात. पिढी उभी करण्याचे काम केले. त्यानंतर वाल्हे येथील हनुमानवस्ती शाळेत बदली झाली. येथे डोंबारी समाज शिक्षणापासून कोसो दूर होता. त्यांनी २३ मुले शोधली, त्यांच्या पालकांशी संवाद साधला. मुलांना स्वतः पुढाकार घेऊन लोकसहभागातून शालेय साहित्य मिळवून दिले. मग स्वतः इको गाडी घेतली. त्यात सर्व मुले बसवायची शाळेत न्यायची त्यांना नाश्ता द्यायचा, दुपारचा पोषण आहार द्यायचा आणी उत्तम शिक्षण द्यायचे व तीन किलोमीटर पुन्हा घरी सोडायचे हि कसरत चार-पाच वर्षे केली.
डोंबारी वस्तीचे सुरेश जाधव पुरस्कार समितीस काल म्हणाले, आता पन्नास मुले आहेत. चाचर गुरजीने पाया घातला म्हणून आधी पोरं शिकली आता आपोआप जात्यात. अजून गुरुजी च्या, कपडे, दफतर घेतात. लॉक डाऊन मध्ये किराणा, कपडे दिली. रेशन कार्ड काढाय मदत केली. गावकरी पण मदत करतात. गुरुजी पण करतात.
या गुरुजींनी कॅनडा रोटरी क्लब कडून चार वेळा एकूण चार हजार मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे स्कुल किट मिळवून दिले. अडीचशे शाळांना सिपीयू दिला. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात आणणाऱ्या आशा प्रकल्पात शिक्षक मार्गदर्शक म्हणून प्रभावी काम केले. पारधी समाजाची मुले प्रवाहात आणली.
COMMENTS