हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री व साखर कोटा मर्यादेचे उल्लंघन केल्यास साखर कारखान्यांवर होणार फौजदारी गुन्हे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास व महिन्याला ठरवून दिलेल्या साखर कोटा मर्यादेचे उल्लंघन केल्यास साखर कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की देशांतर्गत अतिरीक्त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, साखरेची किंमत देशांतर्गत बाजारपेठेत स्थिर व्हावी तसेच ऊस उत्पादकांना FRP प्रमाणे कारखान्यांकडून दर मिळावा याकरीता केंद्र शासनाने शुगर केन (कंट्रोल) ऑर्डर, २०१८ नुसार, दि.१४ फेब्रुवारी १९ रोजी साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केलेली आहे. तसेच बाजारातील साखरेचा मागणीपुरपवठयातील समतोल साधण्याकरीता खुल्याबाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी यासाठीचा साखर विक्रीचा दरमहा कोटा ठरवून दिलेला आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करु नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन
करणेत येऊ नये अशा सूचना संदर्भातील निर्देशानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार, साखर कारखान्याने दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी. तथापि वरील बाबींची अंमलबजावणी न करणे म्हणजे शासनाच्या साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणाचे उल्लंघन आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यावी. शुगर केन (कंट्रोल) ऑर्डर १९६६ मधील तरतूदींचे उल्लंघन निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील याची कृपया नोंद घ्यावी.
सदर सूचनांचे साखर कारखान्यांनी पालन न केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल
आणि याबाबतचा अहवाल केंद्र शासनास कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी. यासंदर्भात राज्यातील पोलीस
विभागास देखील योग्य ती दखल घेणेबाबत सूचना देण्यात येत आहेत.
COMMENTS