खेडशिवापूर येथील पेट्रोलपंपावर रिव्होल्व्हरचा धाक दाखवून लुट
माणिक पवार
भोर, दि. -
पुणे - सातारा महामार्गालगत असलेल्या एका पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाणा करून दुचाकीवर आलेल्या दोघांनी कामगारांना रिव्होल्व्हरचा धाक दाखवून तब्बल दोन लाख ३७ हजार ५०० रोकड लुट करून फिल्मी स्टाईलने पलायन केले आहे. आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहे.
खेडशिवापूर ( ता. हवेली ) येथील पुणे सातारा महामार्गवरील एल. कुदळे अँड सन एचपी या पेट्रोल पंपावर आज गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनिटाच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये दिवसभर पेट्रोल डीझेलची विक्री झालेल्या रक्कमेची हिशोब करून रक्कम मोजून लोकरमध्ये ठेवण्यापूर्वी लुट झाल्याची फिर्याद पेट्रोल पंप कामगार अमोल भीमराव पंडित यांनी दिली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
ठाणे अंमलदार सुधीर खडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर अमोल पंडित व सुदर्शन वानखेडे हे दोन कामगार रात्रपाळीला होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवर दोन अनोळखी इसमांनी हिंदीमध्ये 'पेट्रोल है क्या' यावर कामगारांनी पेट्रोल पंप बंद असल्याचे सांगून पेट्रोल देण्यास नकार दिला. यावेळी अज्ञात आरोपींनी दोन रिव्होल्व्हर बाहेर काढून कामगारांना धाक दाखवून २ लाख ३७ हजार ५०० रक्कम घेतली. तसेच जाताना आरोपींनी दोन दूरध्वनी फोन आपटून कामगारांचे मोबाईल फोन हिसकावून घेऊन सातारा बाजूकडे दुचाकीवरून पलायन केले. पुढील तपास पोलीस करत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले.
COMMENTS