महिला दिनानिमित्त मु. सा. काकडे महाविद्यालयात ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे महिला सबलीकरण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून टाटा ट्रस्टच्या आशा प्रकल्पाच्या समुपदेशक व भारतीय ज्ञान-विज्ञान समुदायाच्या सक्रिय कार्यकर्त्या समीक्षा संध्या मिलिंद यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. रेश्मा पठाण यांनी केले, महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापिका व महिलांना शुभेच्छा दिल्या व महिला दिन साजरा करण्याविषयी रूपरेषा सांगितली, यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक समीक्षा यांनी विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका यांना कोविड १९ मानसिक आरोग्य याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन करीत असताना वास्तविक जीवनात विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला तसेच सर्वांनाच या कोवीडच्या आजारामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ते स्पष्ट केले, त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातील मोबाईलचा वाढता वापर व त्याचा विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर मोलाचे मार्गदर्शन केले. याचबरोबर सेल्फ-टॉक ही संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थिनींच्या समस्या कशा दूर करता येतील यावर उपाय योजना स्पष्ट केल्या.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मेघा जगताप यांनी करून दिला तसेच प्रा. शिल्पा कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी सहसचिव सतीश लकडे व शिवाजी नेवसे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका हे उपस्थित होते. महिला सबलीकरण समितीतील सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला ऑनलाईन मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.
COMMENTS