सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतीच्या सतरा पैकी तेरा जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार पडली. शहरात असलेल्या २१ मतदान केंद्रांवरील २७ बुथ मधून सुमारे ७२.१७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
काल दि २१ रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली मात्र सकाळच्या वेळेस वाढलेल्या थंडीमुळे पहिल्या दोन तासात फक्त १० टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाने व पोलीस प्रशासनाकडून मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून जोरदार तयारी करण्यात आली होती. मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे स्वतः मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले होते.
आज झालेल्या तेरा प्रभागासाठीच्या मतदानात एकुण १३३१४ मतदारांपैकी ९६०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभागनिहाय झालेले मतदान व एकुण मतदान पुढील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक तीन 624/828, प्रभाग क्रमांक चार 1062/1372 प्रभाग क्रमांक पाच 669/915. प्रभाग क्रमांक सहा-329/407 प्रभाग क्रमांक सात 659/816 , प्रभाग क्रमांक आठ 943/1510, प्रभाग क्रमांक नऊ 1000/1497, प्रभाग क्रमांक दहा 742/1049, प्रभाग क्रमांक बारा 669/948, प्रभाग क्रमांक तेरा 336/399, प्रभाग क्रमांक चौदा 1096/1603, प्रभाग क्रमांक पंधरा 490/640, प्रभाग क्रमांक सतरा 993/1325 अशा प्रकारे मतदान झाले आहे. यावेळी वाढलेला मतदानाचा टक्का नक्की कोण्याच्या पारडय़ात पडलाय हे बंद मतपेटी उघडेपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे.
COMMENTS