सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
माळेगाव : प्रतिनिधी
संपुर्ण पंचक्रोशीत ख्याती असलेल्या श्री यमाई देवी मंदिरात थंडीचा फायदा उठवून मंदिराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून देवीच्या गळ्यातील एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रकार( दि.३०) रोजी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान घडला आहे.दरम्यान अज्ञात चोरट्यांनी माळेगांव बु येथील बागेतील आई तुळजाभवानी मंदिरात चोरीचा प्रयत्न करुन मुख्य दरवाजाचा व सिसिटिव्हीची मोडतोड केली आहे हे चोरटे कॅमेरात कैद झाले असून त्यांचा तपास सुरू आहे अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिली.
माळेगाव खुर्द ता.बारामती येथे श्री यमाई देवीचे पुरातन मंदिर आहे.वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असुन वैशाखी पोर्णिमेला मोठी जत्रा भरते.नित्यनियमाने आज पहाटे चारची पुजा करताना पुजारीस मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसून आले.यावेळी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र नसल्याचे निदर्शनास आले.
हि बाब पुजारी यांनी गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थ यांना सांगितली.यामुळे गावात एकच खळबळ उडाली हि खबर पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी मंदिराची पहाणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. या चोरी बाबत सरपंच मंगेश काटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर चोरीचा तपास माळेगाव पोलीस करित आहेत.
दरम्यान चोरट्यांनी शासनाचा क वर्ग दर्जा असलेल्या माळेगाव येथिल बागेतील आई तुळजाभवानी मंदिरात चोरीचा प्रयत्न केला.यावेळी चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडला असुन सिसिटिव्ही कॅमेराची तोडफोड केली आहे.गत वर्षी याच मंदिरात चोरी झाली होती.या चोरीचा छडा पोलिसांनी लावला असुन आरोपी अटकेत आहेत.
दरम्यान याच महिन्यात तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई मंदिर व लाटे येथील मंदिरात चोरी झाली आहे.शिर्सुफळ चोरी प्रकरणी आरोपी ताब्यात आहेत.तर चोरट्यांनी मंदिर लक्ष केल्याने पोलीस यंत्रणेवर ताण पडला आहे.
COMMENTS