सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा सोमवार दि २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती .लोणंद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिलीच सभा हि अर्थसंकल्पीय असले कारणाने या सभेकडे विशेष लक्ष होते. या सभेमध्ये सन २०२२-२०२३ करिता लोणंद नगरपंचायतीचा एकूण रक्कम ४३,३२,४०,०००/- चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
रक्कम र ५१,६१,४७७/-पुढील वर्षाकरिता शिल्लक ठेवण्यात आली. या अर्थसंकल्प सभेदरम्यान नूतन नगरसेवकांच्या माध्यमातून आवश्यक नवीन तरतुदी सुचविण्यात आल्या. सदरच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग, महिला व बाल कल्याण, दुर्बल आर्थिक घटक यांबरोबर आजी माजी सैनिकांच्या शौर्याचा सन्मान म्हणून सैनिक कल्याणकारी योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करिता तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी
नदी व ओढे यांचे पुनर्जीविकरण - ₹ 1 कोटी
सौर ऊर्जा प्रकल्प-₹ 2 कोटी
घनकचरा प्रकल्प-₹ 1.5 कोटी
जलशुद्धीकरण केंद्र - ₹50 लक्ष
पाणीपुरवठा योजना -₹ 1 कोटी
अहिल्याबाई होळकर पुतळा सुशोभिकरण – ₹ 15 लक्ष
नगराध्यक्ष मधुमती पलंगे यांनी यावेळी अमृत 2.0 योजनेच्या माध्यमातून लोणंद शहराच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असून खेमावती नदी तसेच शहरातील इतर ओढे यांचे महत्व ओळखून त्यांच्या पुनर्जीविकरणा करीता तरतूद सुचवून त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 93 तसेच उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांनी यावेळी म्हंटले की, “लोणंद नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२ व माझी वसुंधरा अभियाना मध्ये सहभाग घेतला असून या अभियानांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात येणार आहे.”
प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी लोणंद घनकचरा प्रकल्पाकरीता आवश्यक असणारा जागेचा प्रश्न गहण असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणून प्रशासनामार्फत सदरचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष मधुमती पलंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरसेवक, कार्यालय अधीक्षक शंकर शेळके, लेखापाल अक्षय गुरव, लेखापरीक्षक विजय बनकर, रोखपाल पोपट क्षीरसागर, नगरअभियंता सागर मोटे व विभाग प्रमुख उपस्थित होते.
COMMENTS