सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गाशेजारील दिवळे ता.भोर गावच्या हद्दीतील एका शेतात मेंढपाळ जोडपे मुक्कामास असताना रात्रीच्या वेळी सहा आरोपींनी जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी दि.८ रात्रीच्या वेळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. सदर गुन्ह्याची नोंद राजगड पोलिस ठाण्यात झाली आहे.
गुलाब हिरामण शिंदे व त्याची पत्नी जयश्री (मूळ रा. वढाणे ता.बारामती, सध्या राहणार दिवळे ता.भोर) अशी मारहाण झालेल्या मेंढपाळ जोडप्याची नावे आहेत. तर पावसु रामा महानवर (मूळ रा. कोथाळे ता. पुरंदर जि.पुणे, सध्या रा.दिवळे ता.भोर), अक्षय आबा पांगारे, सुजित मांढरे, मोन्या बाठे, सोन्या लोहकरे, ऋषिकेश घाडगे (सर्व राहणार दिवळे, ता. भोर) अशी मारहाण करणाऱ्या सहा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब शिंदे व त्याची पत्नी मंगळवारी रात्री दिवळे गावच्या हद्दीत एका शेतामध्ये मेंढ्यासहित मुक्कामास होती. यावेळी सदर सहा आरोपी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान याठिकाणी आले. या सहापैकी एका आरोपीस मेंढपाळ याने शिवीगाळ का केली? अशी विचारणा करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मेंढपाळाची पत्नी जयश्री भांडणे सोडवण्यासाठी आली असता तिलाही काठीने मारहाण केली. या दोघांना लाकडी दांडक्याने व काठीने जबर मारहाण केल्याने दोघेही जबर जखमी आहेत. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिनेश गुंडगे करीत आहेत.
COMMENTS