सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता. बारामती) येथील वनपरिक्षेत्रात एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन व साद संवाद स्वच्छता ग्रूपच्या वतीने वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी दोन टॅंकरद्वारे ५ हजार लिटर पाणी सोडण्यात आले. सोमवार(दि. १८) रोजी फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत वाघळवाडी येथील वन विभागात पाणी सोडण्यात आले.
वाघळवाडी येथे शेकडो एकरांवर वनविभागाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी विविध पक्षी, चिंकारा जातीचे हरीण, ससा, तरस आदी वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वाढत्या उन्हाने नागरिकांसह पशुपक्षीही हैराण झाले असून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. या टाक्यांत पाणी सोडल्याने वन्यप्राण्यांची तहान भागणार आहे.
वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी फाउंडेशनने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एक हात मदतीचा सोशल फाउंडेशनने विविध सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. याशिवाय वाणेवाडी येथील साद संवाद स्वच्छता ग्रूपचे सदस्य गाव स्वच्छ ठेवण्याबरोबरच झाडांची विशेष काळजी घेत आहेत. प्रचंड उन्हामुळे वन्यप्राणी लोकवस्तीत येत असतात अनेकदा त्यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ला होत असतो. पाण्याची सोय झाल्याने वनपरिक्षेत्र सोडून ते बाहेर जाणार नाहीत. सोमेश्वर परीसरातील विविध सामाजिक संघटना याठिकाणी हा उपक्रम राबवत आहेत. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश कोकाटे, कर्मचारी नंदकुमार गायकवाड, विठ्ठल जाधव यांच्यासह साद संवादचे ॲड. नवनाथ भोसले, प्रा. रोहित बोत्रे, दीपक भोसले, पत्रकार दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे, तुषार धुमाळ उपस्थित होते.
COMMENTS