सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती)ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरत दमबाजी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रविवार(दि.२४) रोजी भैरवनाथ मंदीराच्या पारावर हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले असल्याने ग्रामस्थांनी औषध फवारणीची मागणी पंधरा दिवसांपूर्वी केली होती. मात्र ते माझे काम नाही असे म्हणत ग्रामविकास अधिकारी शहाजहान बाणदार यांनी ग्रामस्थांच्या , अंगावर धावून जात दमदाटी करण्याचा प्रकार या दरम्यान घडला. याशिवाय अर्वाच्य भाषेत ग्रामस्थांना पाणीच पाजतो अशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शहाजहान बापुसो बाणदार यांची मुरुम गावात सहा महिन्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून आतापर्यंत झालेल्या अनेक ग्रामसभामध्ये त्यांनी चुकीचे ठराव केले आहेत. तसेच ग्रामस्थांना व माझी पदाधिकारी यांना अरेरावीची भाषा करत सर्वाना बघून घेईन माझं कोणी काही करू शकत नाही असं उद्धट वर्तन करीत असतात. सदर ग्रामविकास अधिकारी यांना गावात चिकनगुण्याची साथ चालू असून त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सांगितले असता त्यांनी सर्व ग्रामस्थांचा उद्धट भाषा वापरून अवमान केला असल्याने त्यांची त्वरित बदली करण्यात यावी व त्याजागी तातडीने नवीन नियुक्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर जवळपास ३५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
COMMENTS