सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
महाबळेश्वर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणा-या प्रतापगडावर असलेल्या अफजल खान कबर परिसरात अनेक वर्षांपासुन मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलं होतं. याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळाले होते यानंतर याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भुमिका घेत आंदोलनं देखील केली होती. अफजल खान कबरी जवळचं हे बांधकाम पाडावं अशी मागणी हिंदुत्ववाद्यांची होती मात्र हा विषय गुंतागुंतीचा असल्यामुळं सातारा जिल्हा प्रशासनानं आणि सरकारनं या बाबत तटस्त भुमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अफझलखानाचे आणि त्याच्या अंगरक्षकाचे थडगे सर्वांसाठी खुले करावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी देखील अनेक वेळा केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून जो पराक्रम केला होता, त्याचे स्मरण भावी पिढीला राहावे म्हणून प्रशासनाने या ठिकाणी सर्वांना जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत होती . अफझलखानाच्या कबरीला दिलेला पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा तसेच ही जागा सर्वसामान्यांना खुली करून या ठिकाणी अफजलखान वधाचे शिल्प उभारून त्यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत महाराजांचा पराक्रम लिहावा असा दबाव सुद्धा जिल्हा प्रशासन आणि सरकारवर करण्यात येत होता. अफझलखान भक्तांकडून थडग्याचे उदात्तीकरण करण्यात येतंय यामुळं कबर परिसरात झालेलं बाधकाम पाडण्यात या मागणी जोर धरला होता. शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात अखेर अफजल खान कबर परिसरातील अनाधिकृत बांधण्यात आलेल्या १९ खोल्या पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्यात येत असुन सुमारे ५ ते ६ तास हे बांधकाम पाडण्यास जातील असं सांगण्यात आले आहे. हा विषय संवेदनशील असल्यामुळं या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसंच कोणताच अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्व प्रसार माध्यमांना सुद्धा याठिकाणी प्रवेश नाकारला जात असुन जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी अत्यंत काटेकोर भुमिका घेत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई मधील विषेश बाब म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढुन इतिहास घडवला होता आणि नेमकी १० नोव्हेंबर २०२२ या आजच्या दिवशीच ही कारवाई होताना दिसत आहे.
COMMENTS