सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालं आहे. मानस पगार तसा युवक काँग्रेस मधील चर्चेतला चेहरा होता. रावसाहेब दानवेंच्या घराबाहेर त्यांनी बराच काळ आंदोलन केले होते.
ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं अपघाती निधन झालं आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे. ते सोशल मीडियावर काँग्रेसची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले.
मानस पगार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्या घरासमोर उपोषण करण्यात आलं होतं. त्यात मानस पगार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे", असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मानस यांच्या अपघाती निधनाबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार,रोहित पाटील आदींनी हळहळ व्यक्त करत सोशल मिडीयाद्वारे श्रद्धांजली वाहीली आहे.
COMMENTS