सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संरोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील रायरेश्वर किल्ल्यावर शेतकरी नारायण जंगम यांनी बैलाला रानात गवत चरण्यासाठी सोडले असता बिबट्याच्या हल्ल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे.यापूर्वी एक आठवड्या अगोदर याच शेतकऱ्याचा दुसरा बैल बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता.यामुळे रायरेश्वर किल्ल्यावर बिबट्याची दहशत पसरली असून येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आठवडाभराच्या अंतराने नारायण जंगम यांच्या दोन बैलांना ठार केल्याने सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.मागील १५ दिवसांपूर्वी रायरेश्वर किल्ल्याच्या शेजारील रायरी गावात शेतकऱ्याची दुभती गाय बिबट्याने मारली आहे.सद्यस्थितीला रायरेश्वर किल्ल्यावर व परिसरातील गावात बिबट्याचा वावर असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या काळापासून रायरेश्वर किल्ल्यावर जंगम कुटुंबे राहतात. सध्या ४० कुटुंबे असून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पशुपालन, गव्हाची शेती केली जाते. मात्र बिबट्या दरवर्षी जनावरे मारत असून दिवसेंदिवस जनावरांच्या प्रमाणात घट होत आहेत त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
COMMENTS