सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ विक्रमी गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली असून कारखान्याने १७६ दिवसांमध्ये एकूण १५ लाख २३ हजार ८७६ मे.टन ऊसाचे गाळप करुन १२.२१ टक्के सरासरी साखर उतारा राखून १८ लाख २६ हजार ५०० क्विटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरीमधून ८४,३१,४३८ लि. अल्कोहोल, ३१,८२,५५४ लि. इथेनॉलचे उत्पादन व को-जन प्रकल्पातून ९,६५,१५,३४५ युनिटस् विजेची निर्मिती होवून ५,१४,४४,८३१ युनिटची विक्री झालेली असून सध्या हे दोन्हीही प्रकल्प सुरु आहेत. या गळीत हंगामामध्ये राज्यातील ७,५०० मे.टन प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांमध्ये आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वोच्च गाळप व साखर उत्पादन झाले असून हंगाम कालावधीमध्ये प्रतिदिन सरासरी ८,६५८ मे.टन गाळप करुन स्थापित क्षमतेनुसार ११५% कार्यक्षमतेने २,०३,८७६ मे.टन ज्यादाचे गाळप आपण केलेले आहे अशी माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने ऊस बिलापोटी पहिला हप्ता ३ हजार प्र.मे.टन प्रमाणे दि.१५ एप्रिल २०२४ पर्यंत गळीतास आलेल्या ऊसास आदा केला आहे. अंतिम पंधरवड्याचे बील ३ हजार रुपये व अधिक २०० रुपयांप्रमाणे अनुदान आज दि.०४ मे २०२४ रोजी जमा करणार आहोत. तसेच कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या ऊसाला माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल, २०२४ साठी अनुक्रमे रु.७५, रु.१००, रु.१५० व रु.२०० असे अनुदानही यापुर्वीच आदा केलेले आहे.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हंगाम २०२३-२०२४ मध्ये गाळपास आलेल्या गेटकेनसह सर्व ऊसासाठी दुसरा हप्ता टनाला १०० रुपये प्रमाणे दि.०६ मे २०२४ रोजी ऊस पुरवठादाराच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहोत. तसेच अंतिम ऊस दराबाबत सोमेश्वर हा राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेने कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास संचालक मंडळाच्यावतीने जगताप यांनी व्यक्त केला. तसेच हा हंगाम यशस्वी पार पाडल्याबद्दल कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस तोड पुरवठादार, ऊस तोड कामगार या सर्वांचे मी आभार मानतो असेही जगताप म्हणाले.